महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी विमान व्यवस्था   

अजित पवार यांची उमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा

मुंबई, (प्रतिनिधी) : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. तसेच, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही संपर्क साधून पवार यांनी विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे. शक्य तितकी अधिक विमाने पाठवून पर्यटकांची जलद आणि सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
 
प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे, हीच प्राथमिकता असल्याचे सांगत पवार यांनी  अडकून पडलेल्या पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. 

राज्य सरकारची मदत जाहीर

पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या सहा  जणांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली असून जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार असून  त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे काश्मीरकडे रवाना 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. काल खासगी विमानाने ते जम्मू काश्मीरला रवाना झाले. दरम्यान, राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेचे  मदत पथक मंगळवारी  श्रीनगरला रवाना झाले होते. त्यानंतर आता स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे जम्मू - काश्मीरला गेल्यामुळे सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मदत कार्याला अधिक वेग येणार आहे.
 

Related Articles